पणजी - गोवा सरकारने ऐन चतुर्थीच्या तोंडावर नवी कोविड एसओपी जाहीर केल्यामुळे जनतेमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता, मात्र जनतेच्या वाढत्या रोषामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना अल्पावधीतच आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे. गणेशोत्सव पूजनासाठी भटजींना जाण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश सरकारने जारी केला होता. गणेशोत्सव साजरा करताना जनतेने ऑनलाईन, युट्युबचा आधार घेऊन गणरायाची पूजा करावी, असे निर्देश सरकारने आपल्या आदेशात दिले होते. मात्र सरकारचा आदेश येताच सोशल मीडियावर जनतेने आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे अवघ्या काही तासांतच सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
गणेशोत्सवसाठी सरकारने लागू केलेले नियम हे एक्सपर्ट कमिटी आणि टास्क फोर्स ने घेतला होता. त्याच्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. असे घुमजाव मुख्यमंत्र्यांनी केले. जनतेचा रोष समाज माध्यमातून उठल्यावर ऐन चतुर्थीच्या तोंडावर जनतेची नाराजी ओढवून न घेता सदर निर्णय एक्सपर्ट कमिटीच्या अंगावर ढकलून मुख्यमंत्री सावंत आपला बचाव करू पाहत होते.
- घरात ब्राह्मणांनी येऊन पूजेस प्रतिबंध.
- मूर्तिकारांनी मूर्ती घरोघरी पाठविण्याची व्यवस्था करावी.
- मुले व ज्येष्ठ नागरिकांनी मूर्ती शाळेत येऊ नये.
- सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स राखावे, मास्कचा वापर करावा
- गणेशोत्सवाची जाहिरातबाजी करू नये.
- सार्वजनिक कार्यक्रम न करता रक्तदान, आरोग्य शिबिरे घ्यावीत.
- गणेश मूर्तींचे विसर्जन ५ ते १० वाजेपर्यंत करावे.
राजकीय पक्षांना कोविड लागत नाही -
राज्यात सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी पक्षांचे मेळावे, पक्षप्रवेश आणि वाढदिवस जोरात सुरू आहेत. त्याला हजारोंच्या संख्येने नागरिक, राजकीय कार्यकर्ते हजेरी लावत आहेत. अशावेळी कोविड कोठे जातोय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.