पणजी - विरोधकांकडे सरकारवर आरोप करण्यासारखे काही नाही. त्यामुळे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. परंतु, शेजारील महाराष्ट्रात खरेदी केलेली जमीन कायदेशीररित्या केलेली आहे. मात्र, कोणताही भाग गोव्यात विलिनीकरण करण्यात रस नाही. त्यामुळे गोव्यातील जनतेने निश्चित रहावे, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - 'शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे, आम्ही विरोधात बसण्याची वाट बघतोय'
गोवा शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एका गावात डॉ. सावंत यांनी जमीन खरेदी केल्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारले असता डॉ. सावंत म्हणाले, मी 21 हजार चौरस मीटर जमीन खरेदी केली आहे हे खरे आहे. यामध्ये लपवण्यासारखे असते तर स्वतःच्या नावे खरेदी केली. त्यासाठी स्वतःच्या खात्यातून बाजारमूल्याप्रमाणे पैसे मोजले आहेत. परंतु, काहींना दलालीची सवय झाली आहे. गोव्याच्या जमिनी बाहेरच्यांना विकणाऱ्या दलालांना ओळखले पाहिजे. मी कोणालाही फसवलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
दोडामार्ग तालुका गोव्यात विलिनीकरण करण्यासाठी जोरदार चर्चा होत असताना याचा संबंध त्याच्याशी जोडला जातोय. याविषयी बोलताना सावंत म्हणाले, दोडमार्ग गोव्यात घ्यावा अशी माझी इच्छा नाही. मी कोणाला काही सांगितलेले नाही. गोव्याला घटक राज्य म्हणून दर्जा देण्यात आला आहे तो तेथील भाषा, संस्कृती यांची असलेली वेगळी ओळख आहे, याचा विचार करण्यात आला आहे. माझ्यादृष्टीने गोव्याचे हित महत्त्वाचे आहे. कोणताही भाग विलिनीकरण करून घ्यावा यामध्ये मला रस नाही. त्यामुळे गोव्यातील जनतेने निश्चिंत रहावे, असेही ते म्हणाले.