पणजी - स्कार्लेट किलींग या ब्रिटिश युवतीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी बुधवारी एकाला दोषी ठरवण्यात आले. तर एकाची निर्दोष मुक्तता केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा निवाडा जाहीर करण्यात आला.
फेब्रुवारी 2008 मध्ये उत्तर गोव्यातील अंजुणे समुद्र किनारी स्कार्लेट किलींग (वय 15) या युवतीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर गोवा पोलिसांनी सँमसन डिसोझा आणि फ्लासिडो कार्व्हालो यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. 2010 पर्यंत बाल न्यायालयाने याप्रकरणी 31 जणांची साक्ष नोंदवून घेतली होती. 2016 मध्ये या न्यायालयाने या दोघांची निर्दोष मुक्तता केली होती. याला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे तत्कालीन न्यायाधीश आर. डी. धनुका यांच्या समोर घेण्यात आली होती. त्यांची बदली झाल्याने बुधवारी धनुका आणि पृथ्वीराज चौहान यांनी संयुक्तपणे मुंबईतून व्हिडीओ कॉन्स्फरन्सिंगद्वारे निवाडा जाहीर केला.
संशयित डिसोझा यांच्यावर भारतीय दंड विधानातील विविध कलमांबरोबरच गोवा बाल कायद्यातील कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. ज्याद्वारे संबंधित युवतीचा छळ करणे, लैंगिक अत्याचार करणे, अंमलीपदार्थ देणे, मारहाण करत मरणासन्न अवस्थेत सोडून देणे, पुरावे नष्ट करणे यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सीबीआयने न्यायालयात सिद्ध केला. त्यामुळे त्याला न्यायालयाने दोषी मानले. तर दुसरा संशयित कार्व्हालो याची निर्दोष मुक्तता केली. शुक्रवारी (दि.19) शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाबाहेर सीबीआयचे वकील इजाज खान यांनी एकाला दोषी तर एकाला सोडून दिले असे सांगितले.
या प्रकरणी स्कार्लेटची आई आणि सीबीआयला मदत करणारे अॅड. विक्रम वर्मा म्हणाले, की बाल न्यायालयाने ज्या पुराव्यांच्या आधारे निवाडा दिला होता त्याच पुराव्यांच्या आधारे आज उच्च न्यायालयाने निवाडा दिला आहे. यामध्ये सँमसन डिसोझा याला दोषी मानण्यात आले आहे. तर प्लासिदो कार्व्हालो याची मुक्तता करण्यात आली आहे. मागील अकरा वर्षे स्कार्लेटच्या आईने हे दू:ख सहन केले आहे. ज्या व्यक्तीला न्यायालयाने शिक्षा दिली ती मुक्त फिरत होती. यावर शुक्रवारी शिक्षा जाहीर केली जाणार आहे. किमान 3 ते 10 वर्षे शिक्षा होऊ शकते. परंतु, ते न्यायालयावर अवलंबून आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास गोवा पोलिसांनी केला होता.