पणजी - पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जनता कर्फ्युला प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर गोवा सरकारकडून कर्फ्यु लागू करण्यात आला. परंतु, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीला वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे आज (मंगळवार) सकाळी 6 ते 11 दरम्यान दुकाने सुरू ठेवण्याची घोषणा केली. मात्र, सकाळी दुकाने उघडताच खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली दिसत होती.
हेही वाचा... उद्धव ठाकरेच्या संचारबंदीचे क्रिकेटपटूने केलं स्वागत
अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अन्य सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये बंद राहतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले होते. त्याबरोबरच अत्यावश्यक बाब नसेल तर लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. आज सकाळी दुकाने उघडताच लोकांनी ठिकठिकाणच्या दुकानांवर खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी पणजी मार्केट तर गर्दीने फुलले होते.
मासळी खरेदीसाठी लोकांनी गर्दी करताना सामाजिक अंतराचेही भान त्यांना नव्हते. काही विक्रेते तोंडाला मास्क बांधून विक्री करत होते. मात्र, लोकांची होणारी गर्दी विचारात घेऊन पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता.