पणजी - गोव्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली आहे. मात्र, असं असलं तरीही काही उमेदवारांनी निवडून आल्यानंतरही आपली नाराजी उघड केली आहे. बाबूश मोन्सेरात यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी या विधानसभा निवडणुकीत आपल्याला साथ दिली नाही, असा थेट आरोप बाबूश यांनी केला आहे. तसंच पक्षाने कार्यकर्त्यांना शिस्त शिकवावी असंही बाबूश म्हणाले. आता भाजपा नेत्यांनी बाबूश यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु केले आहेत.
भाजपाने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे आमदारांची नाराजी, तीही बाबूश मोन्सेरात यांच्यासारख्या आमदाराची नाराजी भाजपला परवडणारी नाही. साहजिकच बाबूश यांनी नाराजी व्यक्त करताच देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजप कार्यालयात दाखल झाले. पणजीत भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्याला पाठिंबा न दिल्याचा आरोप बाबूश यांनी केला यावेळी केला.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मला अजूनही स्वीकारलेलं आहे. मनोहर पर्रीकरांचा वारसदार भाजप कार्यकर्ते आपल्याला समजत नाहीत. त्यामुळे त्यांनी उत्पल पर्रीकरांचा प्रचार केला आणि त्यांनाच मत दिलं. ताळगाव मतदारसंघातही जेनिफर मोन्सेरात यांना भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मात्र, आम्ही आमच्या कामाच्या जोरावर निवडून आलो आहोत, असं बाबूश यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान ताळगावात पहिल्यांदाच जेनिफरमुळे भाजपाचा भगवा झेंडा फडकत असल्याचंही बाबूश यांनी सांगितलं.
दरम्यान मला नाकारणाऱ्या आणि माझ्याविरोधात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भाजपाने शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी बाबूश मोन्सेरात यांनी केली आहे. आपल्याला भाजपा कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असता तर जास्त मताधिक्याने निवडून आलो असतो, असा दावा बाबूश यांनी केला आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी विरोधात कितीही काम केलं असलं तरीही भाजपाच्या तिकीटावर निवडून आलो आहे. भाजपासोबतच राहणार असल्याचंही बाबूश यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - Mumbai BMC : मुंबई मेट्रोने मालमत्ता कराचे ११७ कोटी थकवले, पालिकेकडून मालमत्ता जप्तीची नोटीसI