पणजी (गोवा) - गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 28 जुलैपासून सुरू होताना डेल्टा प्लस हा कोविड विषाणूचा नवा प्रकार गोव्यात पोहोचू नये यासाठी सीमेवर विशेषत: सिंधुदुर्गातून येणाऱ्यांची अधिक काटेकोरपणे तपासणी करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. या तपासणीस पुरक म्हणून खासगी प्रयोगशाळांना सीमेवर चाचणी केंद्र उघडण्यासाठी सरकार परवानगी देणार आहे. यासाठी दोन-तीन प्रयोगशाळांशी सरकारची बोलणी सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा - अॅलॉपॅथीवरून देशभरात गुन्हे दाखल झाल्याने रामदेव बाबांची सर्वोच्च न्यायालायत धाव
गोव्यात डेल्टा प्लसचा रुग्ण नाही
आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, डेल्टा विषाणूची काही प्रकरणे गोव्यात आढळली होती. 26 रुग्णांना या विषाणूची लागण झाली होती. मात्र, डेल्टा प्लस या विषाणूची लागण कुठल्याही रुग्णाला झाल्याची माहिती सरकारकडे नाही. सरकार नियमितपणे 15 दिवसांनी काही नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवते. त्यातून असा नवा विषाणू आढळला तर त्याची माहिती समोर येते. कोविडच्या विषाणूचा नवा प्रकार गोव्यात पोहोचू नये यासाठी सीमेवर विशेषत: सिंधुदुर्गातून येणाऱ्यांची अधिक काटेकोरपणे तपासणी करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.
पावसाळी अधिवेशनाची केली घोषणा
राज्य सरकार 28 जुलैपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन घेणार, तसा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान गोवा सरकारने केलेल्या शिफारशीनुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 19 मे रोजी एका अधिसूचनेद्वारे राज्य विधानसभा बेमुदत तहकूब केल्याने आता नव्याने अधिवेशन बोलविण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या धर्तीवर गोवा सरकारही अधिवेशन दोन ते तीन दिवसांत पूर्ण करू पाहत आहे, मात्र अधिवेशन तहकूब केल्याने गोवा सरकारचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
हेही वाचा - कोरोनाने मृत्यू झाल्यास कुटुंबातील व्यक्तीला नागरी सुरक्षा विभागात नोकरी- दिल्ली सरकारचा निर्णय