पणजी - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोव्यातील ज्या पाच नगरपालिकांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. ती प्रक्रिया दिनांक 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे गोवा राज्य निवडणूक आयोगाने आज या पालिका क्षेत्रातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 31 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
आज गोवा निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. यावेळी बोलताना गोव्याचे निवडणूक आयुक्त डब्लू. व्ही. रमणमूर्ती म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या 12 मार्च 2021च्या निर्देशानुसार गोव्यातील मुरगाव, मडगाव, म्हापसा, केले आणि सांगे नगरपालिकांची निवडणूक दि 30 एप्रिलपूर्वी होणे आवश्यक आहे. या निर्देशांचे पालक करताना गोवा निवडणूक आयोगातर्फे निवडणूक तयारी करण्यात आली आहे. या पाचही नगरपालिकांक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 31 एप्रिलपासून 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 9 एप्रिलला छाननी होईल. 10 एप्रिलाला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता उमेदवारांची घोषणा होईल. 23 एप्रिल रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या काळात मतदान होईल. तर 26 रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात येणार आहे.
याबरोबरच उत्तर गोव्यातील सवर्ण कारापूर आणि दक्षिण गोव्यातील वेळ्ळी ग्रामपंचायतींच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्याचाही कार्यक्रम नगरपालिका निवडणूक कार्यक्रम प्रमाणे असेल, असेही आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत 93 प्रभागासाठी मतदान होणार आहे. केवळ मुरगाव नगरपालिका क्षेत्रात 18 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तर उमेदवारास 2 लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. निवडणुकीत कोविड-19 करिता सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाणार आहे. त्याबरोबरच कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना शेवटच्या एका तासात पीपीई किट घालून मतदान करता येणार आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्णांत वाढ; पालिका प्रशासनाकडून 360 आयसीयूसह 2269 अतिरिक्त बेडची व्यवस्था