पणजी : गोवा मराठी चित्रपट महोत्सव यावर्षी 12 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे याचा उद्घाटन सोहळा आगळावेगळा आणि मनोरंजनाने भरलेला असावा, असे नियोजन आयोजकांकडून केले जात आहे. यासाठी ' फक्त मराठी' या आघाडीच्या मनोरंजन वाहिनीचे सहकार्य घेतले जाणार आहे.
विन्सन वर्ल्ड ही खाजगी संस्था दशकभराहून अधिक काळ जून महिन्यात गोव्यात केवळ मराठी चित्रपट महोत्सव आयोजीत टरत आहे. यासाठी पणजीतील कला अकादमी, एक आयनॉक्स थिएटर आणि गोवा मनोरंजन संस्थेची मँकेनिज पँलेसमधील दोन्ही चित्रपट गृहांचा उपयोग केला जातो.
यावर्षीच्या नियोजनाविषयी बोलताना विन्सन वर्ल्डचे संचालक संजय शेटये म्हणाले, दि. 28 रोजी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उद्घाटन सोहळ्याला जोडून तीन तासांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ' फक्त मराठी' वाहिनीच्या सहकार्याने मनोरंजनाचा धमाका सादर केला जाईल. तसेच चित्रपट क्षेत्रातील काही कलाकारांना पुरस्काराने गौरविण्यात येईल.
शेटये म्हणाले, यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि पुष्कराज चिरपुटकर हे आघाडीचे अभिनेते करणार आहेत. तर शशिकांत केरकर, संतोष पवार, पंढरीनाथ कांबळी, रमेश वाणी, किशोरी आंबिये, कमलाकर सातपुते, आदी कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. तर मानसी नाईक, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, आशिष पाटील, पूजा सावंत आणि शुभंकर तावडे नृत्य सादर करणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, सुमित्रा भावे आदींसह चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरु झाली आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सव या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे, असेही शेटये यांनी सांगितले.