नाशिक - पुणे येथे राहणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर धुळ्यातील एका युवकाने आक्षेपार्ह मॅसेज टाकले म्हणून दोन महिला आणि तिघा पुरुषांनी थेट धुळे गाठून मॅसेज टाकणाऱ्या तरुणाचे अपहरण केले. तसेत नाशिक गाठत त्याला रस्त्यावर मारहाण करीत त्याचे केस कापून मुंडन केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पंचवटी पोलिसांनी अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
अपहरण, मारहाण करून बळजबरीने केले मुंडन
पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील नाना शिताना तांडा या वस्तीवर राहणाऱ्या विलास चव्हाण या अठरा वर्षीय तरुणाने पुणे येथे रहाणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर काही आक्षेपार्ह मॅसेज टाकले होते. यामुळे दोन महिला आणि तिघा पुरुषांनी थेट धुळे गाठून मॅसेज टाकणाऱ्या तरुणाचे अपहरण केले. तसेत नाशिक गाठत त्याला रस्त्यावर मारहाण करीत त्याचे केस कापून मुंडन केले. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी हा सर्व प्रकार बघून पंचवटी पोलिसांना फोन करून माहिती दिली आणि वेळीच घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत या सर्वांना पोलीस ठाण्यात आणले. याबाबत विलास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात अपहरण करणे, मारहाण करून बळजबरीने मुंडन करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले. सर्व संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नंबर कसा मिळाला याचा तपास सुरू
विलास चव्हाण याला पुण्यातील महिलेचा नंबर कसा मिळाला, त्यावर मॅसेज कसे टाकले याचा पोलीस तपास करीत असून त्यांची भाषा समजायला आणि तो काय बोलतो आहे हे पोलिसांना कळत नव्हते. विलास अशिक्षित असल्याने त्याच्या मोबाईलवरून अजून दुसऱ्याने कोणी मॅसेज टाकले का याचाही पोलीस तपास करीत आहे.
कायदा हातात घेणे चुकीचे
संशयितांनी विलास चव्हाण विरोधात कायद्यानुसार पुण्यात अथवा धुळ्यात तक्रार नोंदवली असती तर त्याच्याविरोधात विनयभंग आणि सायबर अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला असता, मात्र कायदा हातात घेत स्वतःच न्याय देण्याची भूमिका चुकीची असून संशयितांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - वैफल्यग्रस्त झाल्यानेच चंद्रकांत पाटलांकडून सीबीआय चौकशीची मागणी- अजित पवार