दिंडोरी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्याने पर्यायी मार्गाने वाहतुक वळवण्यात आली होती. मात्र हा पर्यायी रस्ता देखील पहिल्याच पावसात वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर ईटीव्ही भारतने सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर ईटीव्ही भारतच्या प्रयत्नाला यश आले असून, येथील रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने दिवस-रात्र काम करुन चौथ्या दिवशी हा रस्ता वाहतुकीसाठी दुरुस्त केला आहे.
वणी-सापुतारा-सुरत रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू होते. तसेच पांडाणे येथे देव नदीच्या पुलाचे काम देखील सुरू होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून पूलाच्या बाजूने गोलाकार पाईप टाकून मार्ग तयार केला होता. मात्र, रविवारी सप्तश्रृंगी गडावर मुसळधार पाऊस झाल्याने देव नदीला पूर आला होता. त्यामुळे नदीवरील भराव वाहून गेला. त्यामुळे दोन्ही राज्यांचा संपर्क तुटला होता आणि वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली होती, याबाबतचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केले होते.
हेही वाचा... बांधावर बियाणे पोहोचलेच नाही, दुकानातही तुटवडा; पाऊस पडूनही आम्ही पेरावं की नाही?
ईटीव्ही भारतच्या या वृत्ताची दखल घेत सर्वप्रथम विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिंडोरी-पेठचे आमदार नरहरी झिरवाळ, तहसिलदार पंकज पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता मनोज पाटील यांनी त्वरीत पुलाची पाहाणी केली. त्यानंकतर त्यांनी रस्त्याची दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
यानंतर कामाला सुरवात करण्यात आली. परंतु, ठेकेदारांकडे चार फुटी व्यासाच्या (पोकळीच्या) सिमेंटचे मोठे नाले सुरत येथून आणले नसल्याने काम बंद होते. त्यानंतर हे काम अद्यापबंद असल्याची बातमी ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत ठेकदारांने मजूर आणि मोठ-मोठ्या मशीन लावून या रस्त्याचे काम पुर्ण केले. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी स्वतः या कामात लक्ष देत हे काम पुर्ण करवून घेतले. त्यामुळे आता प्रावासी आणि वाहतुकदारांची गैरसोय टळणार आहे.
हेही वाचा... दिंडोरीत मुसळधार पाऊस, गुजरात-महाराष्ट्राला जोडणार पर्यायी रस्ता गेला वाहून
हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: वणी-सापुतारा-सुरत पर्यायी मार्गाची दुरुस्ती सुरू करा, विधानसभा उपाध्यक्षांचे आदेश