नाशिक - एकाच दिवसात तब्बल ४४ हजार ७१२ नागरिकांच्या लसीकरण करण्याचा विक्रम शुक्रवारी नाशिक जिल्ह्याने केला आहे. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली असुन मागील सहा महिन्यातील झालेल्या लसीकरणात हा उच्चांक ठरला आहे.
जिल्ह्यातील पाॅझिटिव्हीटी रेट हा दोन टक्क्यांच्या खाली -
नाशिक जिल्ह्याला गुरुवारी एक लाख ३ हजार लसींचा साठा मिळाला होता. त्यात ८० हजार कोव्हिशिल्ड तर २३ हजार कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे. मागील सहा महिन्यात लसींचा एका दिवसात मिळालेला हा आतापर्यतचा सर्वात मोठा साठा होता. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसरी लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असून पाॅझिटिव्हिटी रेट हा दोन टक्क्यांच्या खाली उतरला आहे. तर मृत्यूदर हा २.११ टक्के आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तरी अनेक ज्येष्ठ नागरिक हे शहरी भागात पहाटेपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी करत तासन् तास उभे राहताना दिसून आले. त्यामुळे लवकरात लवकर आणखी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्यात १८ लाख ८१ हजार जणांचे लसीकरण -
जिल्ह्यात २५ टक्के लसीकरण झाले आहे. आतापर्यंत १८ लाख ८१ हजार जणांचे लसीकरण झाले आहे. त्यात १४ लाख ५ हजार ४७७ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ही ४ लाख ७५ हजार इतकी आहे. जिल्ह्याची दिवसाची लसीकरणाची क्षमता ५० हजार इतकी आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर झाला होता. लस तुटवड्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन दिवस शहर व जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत होते. मात्र, गुरुवारी तब्बल १ लाख ३ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध झाल्या होत्या. दरम्यान, पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहिमेस गती मिळाली आहे. परिणामी, शुक्रवारी ४४ हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण करुन जिल्ह्याने नवा विक्रम प्रस्थापित केला.
सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू -
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ८५७ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.