नाशिक - इंदिरानगर भागात बिबट्याने मॉर्निग वॉकला जाणाऱ्या दोन नागरिकांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली. सपडू आहेर, राजेंद्र जाधव असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, इंदिरानगर भागातील राजसारथी परिसरात वनविभाग आणि पोलिसांकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे.
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून 29 मे रोजी कॉलेज भागातील एका घरकाम करणाऱ्या महिलेला बिबट्याने जखमी करून तेथून धूम ठोकली होती. शुक्रवारी दिवसभर बिबट्याचा शोध घेऊन सुद्धा वनविभागाला बिबट्याला ताब्यात घेण्यात यश आले नव्हते. मात्र आज पहाटे इंदिरानगर भागातील राजसारथी परिसरात मॉर्निग वॉकला घराबाहेर पडलेल्या दोन नागरिकांवर हल्ला केला. यात सपडू आहेर ( वय 66 ) हे ज्येष्ठ नागरिक आणि राजेंद्र जाधव ( वय 53 ) हे जखमी झाले आहेत. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या परिसरात वनविभाग आणि पोलिसांकडून बिबट्याचा शोध सुरू असून नागरिकांनी विनाकारण या परिसरात रस्त्यावर गर्दी करून नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.