नाशिक - महिलांवर होणारे अत्याचार वाढत असून, हे अत्याचार रोखण्यासाठी 'शरिया' सारखा कायदा आणा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे नाशिकला आले होते.
महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. यासाठी आपल्याकडची ढिसाळ व्यवस्था यास कारणीभूत आहे. कायद्याचा धाक, भिती कोणाला राहिली नाही. या संदर्भात शरियत सारखा कायदा आणल्यास कायद्याची भीती निर्माण होईल व महिलांवरील अत्याचार थांबेल, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - आता भाजपच्या स्टंटबाज ताई कुठे गेल्या?; महापौर पेडणेकरांचा सवाल
- निवडणुका मॅनेज करण्यासाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना - राज ठाकरे
काँग्रेस-राष्ट्रवादीने 2012 मध्ये दोनचा प्रभाग केला होता. त्यानंतर भाजप-सेनेने चारचा एक प्रभाग केला. मुळात देशात अशी पद्धत कुठेच नाही. महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने काल प्रभाग रचना जाहीर केली. त्यात मुंबई महानगरपालिकेसाठी एक सदस्य तर राज्यात इतर ठिकाणी तीन सदस्य रचना केली आहे. हा सरकारचा राजकीय डाव आहे. निवडणुका मॅनेज करण्यासाठी प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, हा नुसता खेळ सुरू आहे, फक्त पालिका याच स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रभाग पद्धत का? लोकांनी कोर्टात चॅलेंज करायला हवं, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
- गंभीर प्रश्नांना बगल देण्यासाठी ईडीचा वापर -
सध्या राज्यातील गंभीर प्रश्नांना बगल देण्यासाठी ईडीचा वापर सुरू आहे. तसेच माजी गृहमंत्र्यांना ईडीची भीती नाही. त्यांनी ईडीला वेड्यात काढलं आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रोजच नागरिकांसमोर अशा गोष्टी येत असून, त्याची गरज आहे का? त्यातून निष्पन्न काय होत आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
- खड्ड्यात चार स्पीड ब्रेकर -
माझा कालचा मुंबई-नाशिक प्रवास खड्डे असलेल्या रस्त्यावरून झाला. या खड्ड्यांमध्ये चक्क 4 स्पीड ब्रेकर लागले होते. या रस्त्याचा खेळखंडोबा केव्हा थांबेल? याचं उत्तर जनतेला हवं असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - ...म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट