नाशिक - तीन महिन्यांपूर्वी नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये बोटी जाळण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा तब्बल तीन महिन्यानंतर पोलिसांनी छडा लावला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
दोन गटातील संघर्षातून बोटींची जाळपोळ
24 मार्चला नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंडात शेजारी असलेल्या गंगाखेड या ठिकाणी काही अज्ञातांकडून उभ्या असलेल्या बोटी जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपास सूत्र फिरवली होती. दरम्यान तब्बल तीन महिन्यानंतर पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विकास व्यवहारे, अजय जाधव आणि अक्षय जाधव या तिघाजणांना अटक केली. त्यांनी दोन गटातील संघर्षातून हे कृत्य केल्याची कबुली दिली असल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे.
पोलिसांना खबरी देत असल्याचा गैरसमज
पंचवटी परिसरात लिंबू सरबताची गाडी लावण्यावरून झालेल्या वादात बोट चालवणारा तक्रारदार हा पोलिसांना खबरी देत असल्याचा गैरसमज झाल्याने विकास व्यवहारे, अजय जाधव आणि अक्षय जाधव यांनी बोटी जाळल्या असल्याची कबुली दिली आहे. एक आरोपी हा अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.