नाशिक - सराफ बाजारात दैनंदिन व्यवहारासाठी गेलेल्या एका सराफ व्यावसायिकाची रोकड असलेली बॅग चोरट्याने लांबवल्याचा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, भरदिवसा घडलेल्या या घटनेने सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.
नाशिकमधील गुन्हेगारीत वाढ -
अनलॉक झाल्यापासून नाशिक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून घरफोडी, चोरी, हाणामारी, सोनसाखळी ओरबडणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातत्याने होत असलेल्या या घटनांमुळे आधीच शहरभरात भीतीचे वातावरण असताना गुरुवारी भरदिवसा झालेल्या बॅग लिफ्टिंगच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
व्यापारी भरत पवार यांचे सातपूर परिसरातील अशोकनगर भागात सोने- चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे पवार हे गुरुवारी दुपारी दैनंदिन व्यवहारासाठी सराफ बाजारात गेले. मात्र, यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला असलेली बॅग लांबवली असून, हा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सरकारवाडा पोलिसांकडून तपास सुरू
यावेळी बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच भरत पवार यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, बॅग आढळून न आल्याने त्यानी वेळ न दवडता सरकारवाडा पोलिसात धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मात्र, दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेने सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर, शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून कऱण्यात येत आहे.