नाशिक - देशात दररोज चोरीच्या लाखो घटना घडतात. त्यामध्ये कोणाचा मोबाईल, पॉकेट, सोने आणि अन्य सामानांची चोरी होते. मात्र, ती परत मिळण्याती खात्री कोणालाच नसते. परंतु, नाशिकमध्ये चोराने चोरुन नेलेला मुद्देमाल परत करत माफी मागितल्याची घटना ( Nashik Thief Say Sorry ) समोर आली आहे. त्यामुळे ही चोरी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
नाशिकरोड भागात ही घटना घडली आहे. येथील शरद साळवे यांनी घरफोडी झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा सुरू केला. घरफोडी कशी झाली असेल तसे चोराने घरात कसा प्रवेश केला असेल याचा शोध घेत असताना पोलिसांना घराच्या छतावर एक बॅग मिळाली. त्यामध्ये सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र असा चोरी गेलेला ऐवज होता, सोबतच एक चिठ्ठी होती. त्यामध्ये मला माफ करा असे चोराने लिहले होते.
"मी तुमच्या गल्लीतलाच माणूस आहे. मला माफ करा, मी तुमची बॅग घेतली आणि पत्र्यावर टाकली, मला पैशाची गरज होती, पण मी ते घेतले नाही, सॉरी मला माफ करा," असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिला होता.
चोराने दागिने परत केल्याने पोलिसांचा ताण कमी झाला आहे. मात्र, साळवे यांच्या तक्रारीनुसार अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नाशिकरोड पोलीस पुढील तपास करत आहे.
हेही वाचा - Corona Restrictions In Maharashtra : मंत्रालयाचा कारभार पुन्हा ५० टक्क्यांवर, दोन शिफ्टमध्ये होणार कामकाज