नाशिक - नाशिक शहरात बकरे चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. नाशिकच्या सातपूर भागात मटण दुकानदारांचे 26 बकरे अज्ञातांनी चोरून नेले आहे. त्यामुळे आता मटण विक्रेते चिंतेत सापडले आहेत. दरम्यान चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बागलाण मटण विक्रेत्यांचे 21 बकरे व ईजना मटण शॉपचे 5 बकरे चोरुन नेले आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा तपास करत आहे.
चोरी करण्याआधी सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता या चोरट्यांनी आपला मोर्चा बकऱ्यांच्या चोरीकडे वळवला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील मटण विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास सातपूर परिसरात असलेल्या बागलाण मटण शॉपमधून तब्बल २१ बकरे तर ईजना मटन शॉपमधून पाच बकऱ्यांची चोरी करण्यात आली आहेत. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास सातपूर परिसरातील श्रमिक नगरमध्ये असलेल्या बागलाण मटन शॉपचे मालक हुसेन खाटीक यांनी दहाच्या सुमारास आपल्या बकऱ्यांना चारापाणी देऊन दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानावर आले असता या ठिकाणी गोठ्याचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २१ बकऱ्या चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तर याचवेळी जवळच असलेल्या ईजना मटन शॉपमधील पाच बकरे चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला असता एका चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी लॉक तोडून बकरे चोरून नेल्याचे दिसून आले. चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडण्याचादेखील प्रयत्न केला असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मागील वर्षीदेखील चोरीचा प्रयत्न
याच चोरांनी मागील वर्षीदेखील चोरीचा प्रयत्न केला होता, पण तो फसला होता. आता मात्र दोन दुकानात 26 बकरे चोरून नेले आहेत. याप्रकरणी संबंधित दुकान मालकांनी सातपूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार केली आहे. तर अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे बकरे चोरी झाल्याचे यावेळी दुकान मालकांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. एक महिन्यापूर्वी अशीच एक घटना नाशिकच्या अंबड परिसरात घडली होती. त्यावेळीदेखील एकाच दिवसात तब्बल १६ बकरे घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. दरम्यान शहरातील मटण विक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.