नाशिक - घर मालकिणीने भाड्यासाठी तगादा लावल्याने भाडेकरू दाम्पत्याने घर मालकिणीचा गळा आवळून हत्या केली. ही घटना नाशिकच्या चुंचाळे परिसरातील दत्तनगर भागामध्ये घडली आहे. या घटनेचा उलगडा करत पोलिसांनी अवघ्या तासाभरात चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नाशिकच्या चुंचाळे परिसरातील दत्तनगर या ठिकाणी राहणाऱ्या जिजाबाई पांडुरंग तुपे यांच्या घरामध्ये निलेश शिंदे आणि दिपाली शिंदे हे दाम्पत्य भाडेतत्त्वावर राहायला होते. पोलिसांच्या माहितीनुसार काही दिवसांपासून घराचे भाडे थकल्याने जिजाबाई तुपे यांनी त्याच्याकडे थकित घरभाडे लवकर देण्यासाठी तगादा लावला. यामुळे संतप्त झालेल्या या भाडेकरू दाम्पत्याने आणखी दोघांच्या मदतीने मंगळवारी (13 एप्रिल) रात्री जिजाबाई तुपे यांचा घरात घुसून घर मालकिणीची हत्या केली. त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन त्यांचा मृतदेह राहत्या घरात एका गोणीमध्ये कोंबून ठेवला होता.
हेही वाचा-शिवभोजन थाळीने राज्यात शुक्रवारी दुपारपर्यंत 1 लाख 95 हजार लोकांची भागवली भूक
दरम्यान बुधवारी सकाळी जिजाबाई कुठेही न दिसून आल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र त्या कुठेही आढळून न आल्याने याबाबत त्यांना पोलिसांना माहिती दिली. यावेळी वृद्ध महिलेच्या घरात राहणारे दाम्पत्य अचानकपणे गावी गेल्याचे समोर आले. अंबड पोलिसांनी निलेश शिंदे आणि दिपाली शिंदे यांना त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या ठिकाणाहून अटक केली. यावेळी त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मंगेश कदम आणि विष्णू कापसे या दोघांच्या मदतीने जिजाबाई तुपे यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-नागपुरात कोरोनाने 75 जणांचा मृत्यू; 6196 नवे बाधित
चौघे संशयित पोलिसांच्या ताब्यात-
दरम्यान अवघ्या तासाभरात अंबड पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत या प्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केले जात आहे मात्र अवघ्या काही पैशांसाठी घरमालकिणीचा अशाप्रकारे खून करण्यात आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.