नाशिक - ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख नाशिक दौऱ्यावर असतांना पत्रकारांशी बोलत होते.
यापुढील निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्र-
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीने फिल्डिंग लावली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश, हे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉंग्रेसच्या समन्वयाचे फळ आहे. या आधी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला यश मिळाले होते. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मिळाले आहे. पुढील निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्र असेल, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
विरोधकांनी मुंगेरीलाल के सपने पाहणं सोडावे-
तसेच नामांतर विषयात समन्वय समिती चर्चा करून मार्ग काढेल, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी मुंगेरीलाल के सपने पाहणं सोडावे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. लोकांना काम आवडत आहे. त्यामुळे विधान परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये आम्हाला जनतेने कौल दिला आहे. यापुढील निवडणूका आम्ही एकत्र लढवणार असून सरकार पाच वर्षे नाही तर पुढे पण चालत राहील. विरोधकांनी मुंगेरीलाल के सपने पाहणं सोडावे, असा सल्ला देत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला टोला लगावला.
हेही वाचा- 'आदर्श' गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटलांच्या पॅनलचा दारूण पराभव
हेही वाचा- कॅब कंपन्यांच्या मनमानीला नवीन नियमामुळे चाप, ग्राहकांसह चालक-मालक समाधानी