नाशिक - येत्या दोन दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा इंटक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने कामागरांचे पगार व्हावे, यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली. मात्र परिवहन महमंडळाने अद्याप याची दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे.
नाशिक एसटी प्रशासन इंटक संघटना आणि कामगार सहाय्यक उपायुक्त यांमध्ये आज बैठक झाली. त्यात लवकरचं एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची मदत कामगारांना मिळाली नाही. त्यामुळे दोन दिवसांत पगार न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
जळगाव आणि रत्नागिरीत झालेल्या एसटी कामगारांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार आहे. जळगावला झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट मिळाली. यामध्ये राज्य परिवहन आणि सरकारला जबाबदार धरण्यात आलं आहे. यानंतरही गांभीर्याने विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे.