नाशिक - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानसिक स्वास्थ्य सध्या ठीक नाही. त्यांना मानसिक आधार मिळावा म्हणून सर्व शिवसैनिक प्रार्थना करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा प्रार्थना करावी, असेही राऊत म्हणाले आहेत. आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निमित्ताने संजय राऊत नाशिकला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला वांझोटे म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे - विजय वडेट्टीवार
नारायण राणे यांचे स्वास्थ्य चांगले नाही. त्यांना आता मानसिक आधाराची गरज आहे. शिवसैनिक मानसिक आधार देतील. परंतु, त्यांच्या मुलांनीदेखील त्यांना मानसिक आधार द्यावा, असे सांगून भाजपने शिवसेनेवर टीका करण्यासाठी राणे यांना पक्षात घेतले, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
- एका व्यक्तीमुळे भाजप-सेनेचे नाते बिघडले -
शिवसेना आणि भाजपचे नाते 25 वर्षांपासूनचे आहे. मात्र, एका व्यक्तीमुळे हे नाते बिघडले आहे. या गोष्टी मला आणि उद्धव ठाकरे यांनादेखील पटल्या नाहीत. नारायण राणे जे बोलतात ते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील किंवा आशिष शेलार बोलू शकत नाहीत, म्हणून राणे यांना भाजप पुढे करत आहे. पण, एक दिवस राणे पस्तावतील त्यांना चुकीची जाणीव नक्की होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
- मराठा आरक्षणावरून राऊत यांची भाजपवर टीका -
संभाजीराजे हे छत्रपती आहेत. त्यांच्या नावाला एक वलय आहे. संभाजीराजे जेव्हा मराठा आरक्षणावर संसदेत बोलत होते तेव्हा भाजपचे सर्वजण मूग गिळून गप्प होते. मी त्यांना बोलू देण्याचा आग्रह धरला होता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संभाजीराजेंना बोलू दिले नाही तेव्हा भाजपची छत्रपतींबद्दलची अस्मिता कुठे गेली होती? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगणाऱ्या राजनाथ सिंहांनी महाराष्ट्राची माफी मागावी - संभाजी ब्रिगेड