नाशिक - मोदी हेच भाजपाचे आणि देशाचे मोठे नेते असून भाजपला प्राप्त झालेले आत्तापर्यंतचे यश केवळ मोदींमुळेच मिळाले आहे. मात्र, पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करु नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करु नये. प्रचारात कोणाचा चेहरा वापरायचा ते कार्यकर्ते ठरवत असतात. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. त्यामुळे एखाद्या नेत्याचा प्रचारात चेहरा वापरायाचा का नाही असे पक्षाने ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असेही संजय राऊत म्हणाले, ते नाशिकमध्ये बोलत होते.
वाघ ठरवतो मैत्री कोणाशी करायची-
आगामी महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सर्वच राजकीय पक्षातील वरिष्ठ नेते हे स्थानिक पातळीवर दौरे करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील चार दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी नाशिक मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत माध्यमांशी संवाद साधला. संघटनेचे दौरे होत असतात या स्थितीत फारसा बाहेर पडता आले नाही, मागच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला. आता उत्तर महाराष्ट्रात करत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून महा विकासआघाडी मधील सर्वच घटक पक्ष हे आपापल्या पक्षाचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना टोला लगावला. पंतप्रधानानी सांगितल्यास आम्ही वाघाशीही मैत्री करू असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना वाघाशी मैत्री होत नसते, वाघ ठरवतो मैत्री कोणाशी करायची, यासाठी चंद्रकांत दादांनी सल्ले देऊ नये जर त्यांना मैत्री हवी असेल तर त्यांनी त्यावर विचार करावा आणि कोणाशी मैत्री करावी, याची यादी देखील पाठवावी, असा उपरोधिक टोला देऊन राऊत म्हणाले की, आज चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा आणि गोड खाऊन त्यांनी हा वाढदिवस साजरा करावा म्हणजे येणारे वर्ष त्यांच्यासाठी गोड जाईल, असा विश्वास खा.संजय राऊत व्यक्त केला आहे.
मालाड इमारत दुर्घटना ही प्रचंड दुर्दैवी-
याचबरोबर मालाड येथे झालेली इमारत दुर्घटना ही प्रचंड दुर्दैवी असून मोडकळीस आलेल्या इमारती आणि पावसाचा प्रमाण यामुळे इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व पदाधिकारी काल रस्त्यावर उतरले होते मात्र टीका करणाऱ्यांना हे दिसत नसल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुंबईतील पावसा वरून महाविकास आघाडी सरकारला निशाणा करणाऱ्यांना टोला लगावला आहे.