नाशिक - राज्यपाल नियुक्त आमदार न होऊ देणारे घटनेचे मारेकरी आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी नाव न घेता. राज्यपाल आणि भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तसेच याबाबत राज्यपालांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे सुद्धा राऊत म्हणाले. ते आज नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत होते.
भाजपला नाशिक मध्ये मोठे खिंडार-
माजी आमदार वसंत गीते, भाजप नेते सुनील बागुल यांचा शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाला. या दोन दिग्गज नेत्यांच्या जाण्याने भाजपला नाशिक मध्ये मोठे खिंडार पडले आहे. राऊत यांनी दोघांचेही भगवी शाल देऊन पक्षात स्वागत केले. तसेच सायंकाळी मुंबईत गीते आणि बागुल यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जबाबदारी निश्चित करतील, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद विमानतळ नाव बदलण्याचा ठराव कॅबिनेटकडून मंजूर-
औरंगाबाद विमानतळ नाव बदलण्याचा ठराव कॅबिनेटनं मंजूर करून केंद्राला पाठवला. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे विमानतळ हा प्रस्ताव सरकारने दिला आहे. काँग्रेस मनातून संभाजीनगर नावाला सकारात्मक आहे. तसेच बिहार मधील औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर करावं अशी मागणी आहे. यावर भाजपनं भूमिका स्पष्ट करावी. किमान समान कार्यक्रमावर लोकभावनेवर निर्णय घ्यायचा नाही, असं नाही, असेही राऊत म्हणाले.
तर अनेकांना पळापळ करावी लागेल-
संजय राऊत म्हणाले, माझ्यावर कोणताही घाव, वार, हल्ला याचा परिणाम होत नाही. इडीची नोटिस म्हणजे सरकारी कागद आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळापळ करावी लागेल. इडी आणी सीबीआय मागे लावणाऱ्यांनी हे लक्ष्यात ठेवावं, असा इशारा देत राऊत यांनी भाजपाला टोला लगावला. प्रताप सरनाईक यांना वेगळा न्याय आणी गिरीश महाजन यांना वेगळा का? असा प्रश्न देखील राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा खून केला-
दिल्लीत आंदोलनात शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. हे केंद्रानं केलेले खून आहेत. राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांवर लवकरच तोडगा निघेल. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे असून किरीट सोमय्या यांचा जन्म आरोपातून झाला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा- ठरलं..! 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशकात होणार