नाशिक - इगतपुरीमध्ये पोलिसांनी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा टाकत तब्बल 22 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये काही महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तर 1 महिला बिग बॉस या शोमध्ये काम केलेली असल्याचे समजते.
रेव्ह पार्टीत ड्रग्स आणि हुक्का याचे सेवन
इगतपुरी तालुक्यातील दोन बंगल्यांमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा टाकला. यामधील एका पार्टीमध्ये बिगबॉस मालिकेतील एका अॅक्ट्रेसचाही समावेश होता. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, इगतपुरीत आज रविवार पहाटेच्या सुमारास मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर रेव्ह पार्टी सुरू आहे, अशी गुप्त बातमी मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धाड टाकून कारवाई केली.
एकूण 22 जणांवर कारवाई
इगतपुरी परीसरातील रेव्ह पार्टीमध्ये फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या 4 महिलांसोबत बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या एका अॅक्ट्रेसचाही समावेश होता. यात दहा पुरुष व बारा महिलांचा समावेश होता. पोलिसांनी एकूण 22 जणांवर कारवाई केली आहे. तर त्यांना मदत करणाऱ्या इतर सहयोगींवर देखील कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल; तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय - शरद पवार