नाशिक- अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाजनादेश यात्रेची सांगता येत्या 19 तारखेला नाशिकमध्ये होणार असून या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला सुरवात केली होती. याच यात्रेची सांगता येत्या 19 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे.
सध्या कार्यक्रमाची जोरदार तयारी नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या मैदानावर सुरू आहे. या कार्यक्रमाला जवळपास तीन लाख लोक येतील असा अंदाज भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. याच अनुषंगाने ही संपूर्ण व्यवस्था करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौर्यात नेमकी कार्यक्रमाची आखणी कशाप्रकारे असणार आहे या संदर्भात स्थानिक भाजपच्यावतीने बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
हेही वाचा- शरद पवार सोमवारी नाशिक दौऱ्यावर; विधानसभानिहाय बैठकीचे आयोजन
या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी गोदा आरती करावी अशी मागणीदेखील नाशिक स्थानिक भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेच्या कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी नाशिक मध्ये गोदा आरती देखील करू शकतात. महाजनादेश यात्रेच्या सांगता कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थित असणार असले तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक प्रकारे नरेंद्र मोदी येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ फोडतील असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.