नाशिक - डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकच्या लिकेजमुळे घडलेली घटना अतिशय दुःखद व मन हेलावणारी आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी इतर रूग्णालयांच्या ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी करण्यात येऊन, तांत्रिक बाबींची पडताळणी केली जाईल, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.
दोषींवर योग्य कारवाई
मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानुसार या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. तर दोषींवर योग्यती कारवाई करण्यात येईल. तसेच या रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुःखद असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य शासनच्यावतीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणात
यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. रुग्णालयातील इतर रुग्णांना चांगले उपचार मिळतील यासाठी यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत आहे. आता ऑक्सिजन गळती पूर्णतः थांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा - लोकल, मेट्रो आणि मोनोची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद!