नाशिक - जगात केवळ 6 टक्के लोक पदवीधर असून नवीन तंत्रज्ञानाने शिक्षण दिले तर 60 टक्के लोक पदवीधर होतील, असे मत जागतिक दर्जाचे शिक्षणतज्ञ मायकल मॅथ्यूज यांनी व्यक्त केले. ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.
30 मानवी अधिकारांपैकी शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, असे असताना जगात केवळ 6 टक्के लोक पदवीधर असल्याचे समोर आले आहे. शिक्षणाबद्दल लोकांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. जेव्हा तुम्ही साक्षर असला तेव्हाच अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी मिळतील, असे मत मायकल मॅथ्यूज यांनी व्यक्त केले.
जगभरातील लोकसंख्येपैकी 25 टक्के लोकसंख्या भारतात आहे. भारतातील प्रत्येकाच्या शिक्षणाचा प्रश्न जर नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सोडवला तर जगाच्या 25% समस्या आपण सोडवू शकतो. जागतिक शिक्षणाच्या संकटातून मोठा अडथळा दूर करता येईल, असे मॅथ्यूज म्हणाले. मोबाइल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, त्याचा वापर जर शिक्षणासाठी केला तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आकर्षण निर्माण होईल, असे मॅथ्यूज यांना वाटते.