नाशिक - शहरातील रस्त्यांवर लवकरच इलेक्ट्रिक बस धावणार आहे. शनिवारी नाशिक ते सातपूर मार्गावर या बसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी स्थायी समिती अध्यक्ष उद्धव निमसे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी चव्हाण, बाजीराव माळी, शेखर डोके आणि विलास शिंदे उपस्थित होते.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नवी मुंबई व पुण्यानंतर आता नाशिक महानगरपालिकेतर्फे इलेक्ट्रिक बसचा प्रयोग करण्यात येणार आहे.
नवी मुंबईत 75 इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावत आहेत. याच अनुषंगाने आता नाशिक महापालिकेतर्फे 150 इलेक्ट्रिक, 200 सीएनजी तसेच 50 डिझेल बस चालवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शहरी भागातील वायू व ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उत्तम पाऊल आहे.
# इलेक्ट्रिक बसची वैशिष्ट्ये
संबंधित बसची बॅटरी चार्ज होण्यासाठी चार तास लागत असून, यानंतर बस जवळपास 225 किलोमीटर अंतर पार करू शकते. बसमध्ये वातानुकूलित यंत्रणा असून, अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बस चालक कंट्रोलर, मोबाईल चार्जिंग पॉईंट, आपत्कालीन व्यवस्था, अग्निप्रतिबंधक यंत्रणा यांचा समावेश आहे. तसेच जीपीआरएसच्या माध्यमातून बसचे लोकेशन समजण्यास मदत होणार आहे.
लांबी - 12 मीटर
आसन क्षमता - 39 ते 55