नाशिक - शस्त्र तपासणीसाठी नाशिक पोलीस आता नाकेबंदी करून, शहरात वाहनांची तपासणी करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली आहे. वाहन तपासणीच्या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांवर काही प्रमाणात वचक बसेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा - पंढरपुरात पूरपरिस्थिती, 8 हजार कुटुंबांना हलवले सुरक्षितस्थळी
नाशिकमध्ये गेल्या महिन्याभरापासून चैन स्नॅचिंग, मारामारीच्या घटना वाढल्या असून, यात गुन्हेगार सर्रास प्राणघातक हत्यारांचा वावर करत आल्याचे समोर आले आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या क्राइम ब्रँचमध्ये कार्यरत असलेले गुलाब सोनार यांनी पत्नीसमवेत दोन सोनसाखळी चोरांना मोठ्या शिताफीने अटक केली होती. यावेळी त्यांच्याकडून चाकू, तलवारसारखे प्राणघातक शस्त्र मिळून आले होते. यामुळे आता पोलिसांनी गुन्हेगारांचा बिनमोड करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
दहा दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशानुसार नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगारांच्या घरी अचानक छापे टाकण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांना गावठी कट्टा, काडतुसे, चाकू, चॉपर, फायटर, लोखंडी रॉडसारखे 36 हत्यारे मिळून आले होते. यात 10 संशयित सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याचाच एक भाग म्हणून पोलीस आता रस्त्यावर उतरणार असून, अचानकपणे ठिकठिकाणी नाकेबंदी करून शस्त्र तपासणीसाठी दुचाकींची तपासणी केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी या मोहिमेत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे.