नाशिक: मध्ये गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्यातून वाहन चालवतांना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहे. तर, आम्ही महानगरपालिकेसमोर (Nashik Municipal Corporation) आंदोलन करू (warning of agitation) असा इशारा मनसेने दिला आहे.
नाशिक मध्ये गेल्या पाच दिवसंपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील सर्वच धरण ओव्हर फ्लो झालेत. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. तसेच नाशिक शहरात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असं म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. एकीकडे पावसाची संततधार सुरू असताना खड्ड्यातून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकीच्या कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागतो.
या भागात खड्डेच खड्डे: स्मार्ट सिटी कडे वाटचाल करताना नाशिकचे रस्ते मात्र ऑक्सिजनवर आहे. नाशिक शहरातील नाशिकरोड, उपनगर, ठक्कर बाजार, वडाळा नाका, ठक्कर बाजार बस स्थानक, निमानी, पेठ रोड, रविवार कारंजा, राहू हॉटेल या भागात रस्त्यांची पावसामुळे चाळणी झाली आहे. आणि अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून खड्डे बुजवताना वापरण्यात आलेली खडी देखील अस्ताव्यस्त झाल्याने खड्ड्यात पाणी साचले आहे. वाहनधारकांना याचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघात देखील होत आहेत.
खड्ड्यामुळे मृत्यू : नाशिकच्या अशोका मार्ग रस्त्यावरील खड्ड्यामुळे 27 जून रोजी भावेश कोठारी या 40 वर्षाच्या दुचाकी स्वाराला आपले प्राण गमवावे लागले. एका खाजगी रुग्णालयासमोर हा अपघात झाला. रस्त्यावरील खड्डे आणि ठिकठिकाणी चाललेली खोदकामे यामुळे पावसाळ्यात वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.
मनसे कडून आंदोलनाचा इशारा: नाशिक मध्ये पहिल्याच पावसात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात गॅस पाईपलाईन आणि पाण्याची पाईप लाईन चे काम करण्यात आले. मात्र हे खड्डे व्यवस्थित रित्या बुजवले गेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात पाणी साचले आहे. नागरिकांना वाहन चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे अपघात होत आहे. नागरिक जखमी होत आहेत. यासंदर्भात मनसेने महानगरपालिकेला निवेदन दिले आहे. पुढील आठ दिवसात शहरातील खड्डे व्यवस्थितरीत्या बुजवले गेले नाही तर, आम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे.
हेही वाचा : VIDEO - गंगानगरमध्ये बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी तीन तरुणांनी मारल्या उड्या, पाहा बचावाचा व्हिडिओ