नाशिक - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान मोबदला देण्याची तरतूद असताना देखील नाशिकच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाकडून जबरदस्तीने संमती पत्र लिहून घेत विना मोबदला काम करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
आठवडाभरात मोबदला न दिल्यास मनसेचा इशारा
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून विना मोबदला काम करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. तेच याबाबत संमती पत्र देखील लिहून घेण्यात येत असल्याचे संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी नाशिक आगराबाहेर गोंधळ घातला होता. दरम्यान या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळांच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची दखल घेत आठवडाभरात विद्यार्थ्यांना मोबदला न दिल्यास मनसे स्टाईल दणका देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना गेल्या 2 महिन्यांपासून वेतन नही
एसटी महामंडळच्या नाशिक आगारात जवळपास 100 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना गेल्या 2 महिन्यांपासून वेतन अदा न करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोबदला देण्यास महामंडळाने दिलेल्या मुदतीत वाढ होणार, की मनसेला पुन्हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.