नाशिक - पोलिसांनी अवैध शस्त्रांची तस्करी करणारी टोळी जेरबंद करुन त्यांच्याकडून 9 देशी बनावटीचे कट्टे, 20 जिवंत काडतुसांसह 4 संशयितांना जेरबंद केले आहे.
भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील नानावली परिसरात अवैध शस्त्रांची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 च्या टीमने नानावली परिसरात सापळा रचला. नानावली व नारायण बापुनगर येथील अजहर सय्यद (रा. वैजापूर, औरंगाबाद), संदीप गांगुर्डे (रा. जेल रोड ,नाशिक), मोहम्मद सय्यद (रा. नानावली), गुलाम पठाण (रा. भद्रकाली) संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्यांच्याकडून 9 देशी बनावटीचे कट्टे आणि 20 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता हे संशयित मध्यप्रदेशातील उमरठी येथून हा शस्त्रसाठा आणून नाशिक शहरात विक्री करत असल्याचे पुढे आले.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे, रवींद्र सहाने, महेश इंगोले, रूपाली खांडवी, विजय लोंढे, शामराव भोसले, राजेंद्र जाधव, राजाराम वाघ, श्रीराम सपकाळ, देवकिशन गायकर आणि शंकर काळे यांच्या पथकाने केली.