नाशिक - कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य वाढीव वीज बिले पाठवून आर्थिक संकटात टाकणाऱ्या महाविज वितरण कंपनी आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी नाशिक शहर भाजपच्या वतीने शहरातून पदयात्रा काढत आंदोलन करण्यात आले. तसेच राज्य शासनाने लवकरात लवकर ही वाढीव बिले मागे न घेतल्यास भाजपच्या वतीने येत्या काळात भव्य आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
लॉकडाउन काळात शासनाने वाढीव वीज बिल माफ करण्या ऐवजी जादा दराने आकारून सर्वसामान्य जनतेला संकटात लोटले असल्याचा आरोप सातत्याने भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. यामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेला वीज बिल पूर्णतः माफ करावी किंवा कमी करून द्यावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापूर्वी शहरभरात भाजपच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र त्यावर अद्यापही शासनाने तोडगा न काढल्याने नाशिक शहर भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळतय. याचाच एक भाग म्हणून सोमवारी नाशिक शहर भाजपच्या वतीने हातात शासनाचा निषेध करणारे फलक घेऊन आणि वीज बिल जाळून आंदोलन करण्यात आले .
यावेळी सिडको परिसरातून पदयात्रा काढण्यात आली तसेच शासनाने ही वीज बिले 50% कमी करावी अशी मागणी यावेळी भाजप पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आली. तसेच शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
हे आंदोलन दोन टप्प्यात करण्यात आले असून यातील पहिल्या टप्प्यात सिडको पवन नगर ते सिटी सेंटर मॉल पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी हातात वीजबिले आणि फलक घेऊन रोष व्यक्त केला. तर दुसऱ्या टप्प्यात काठेगल्ली सिग्नल ड्रीम सिटी उपनगर ते बिटको परिसरात असलेल्या विद्युत भवनावर या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. तसेच यावेळी महावितरण कार्यालयातील वरिष्ठांना निवेदन देखील देण्यात आले. या आंदोलनात महापौर सतीश कुलकर्णी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय साने जगदीश पाटील संभाजी मोरुस्कर प्रथमेश गीते यांसह विविध भाजप पदाधिकारी उपस्थित होते.