नाशिक - नाशिक विमानतळावरुन हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद, नाशिक अहमदाबाद, नवी दिल्ली, बंगरुळ याबरोबरच आजपासून नाशिक बेळगांव विमान सेवा सुरु झाली आहे. नाशिकमधील वाढत्या विमानसेवेने उद्योग व पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
गाडीपेक्षाही कमी खर्चात व कमी वेळेत प्रवाशांना बेळगांवला जाणे सोयीस्कर..
ओझर विमानतळ येथे स्टार एअर कंपनीच्या नाशिक बेळगांव विमान सेवेचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक बेळगांव विमान सुरु होणे हे जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. कारण या विमानसेवेमुळे गाडीपेक्षाही कमी खर्चात व कमी वेळेत प्रवाशांना बेळगांवला जाणे सोयीस्कर व आरामदायी होणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनास देशभरातून येणाऱ्या साहित्यिकांना देखील या विमानसेवेचा लाभ होणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे.
२८ मार्चपासून नॉन स्टॉप कोलकाता विमानसेवा सुरू होणार-
ओझर येथील विमानतळावरुन प्रवासी विमानसेवेने मोठे उड्डाण घेतले असून आता नॉन स्टॉप कोलकाता विमानसेवा सुरू होत आहे. येत्या २८ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे. आघाडीच्या स्पाईसजेट कंपनीने ही घोषणा केली आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला आणखी वेग येणार आहे. नाशिकशी देशातील आणखी एक महत्त्वाचे शहर यानिमित्ताने जोडले जाणार आहे. अवघ्या दीड ते २ तासात नाशिककर कोलकाता येथे पोहचणार आहेत. विशेष म्हणजे, सध्या नाशिकहून सुरू झालेल्या सर्व सेवा या केंद्र सरकारच्या उडान या योजनेअंतर्गत आहेत.