नाशिक - देशभरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, देशातील तरुण वर्गाला याचा लाभ मिळालेला नाही, यामुळे नाशिकमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने जागतिक नेता म्हणून मिरवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लस निर्यात करुन देशातील तरुणांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्षाच्या वतीने मोदींना जाब विचारणारे पोस्टर्स पंचवटी परिसरात लावण्यात आले आहेत. लस नसल्याने जिल्ह्यासह राज्यभरातील 18 ते 44 वयोगटातील तरुणांचे लसीकरण थांबवण्यात आले आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात हीच परस्थिती असल्याने देशातील तरुणवर्ग संतप्त झाला आहे, असाही आरोप आपच्या वतीने करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस चिडीचूप का? -
नाशिकमध्ये आपच्या वतीने लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींना जाब विचारण्यासाठी नाशिकच्या पंचवटी परिसरात पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टर्सवर मोदीजी आमच्या लेकरांचे वॅक्सीन परदेशात का पाठवले?, असा प्रश्न आपच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीयांच्या हक्काच्या लसी परदेशात पाठवणाऱ्या मोदींबद्दल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस चिडीचूप का?, असा प्रश्नही यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -'तौत्के चक्रीवादळ';मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात
नाशिकच्या तरुणांना कधी लस मिळेल? -
लहानसहान गोष्टींचे भांडवल करत राजकारण करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मोदींनी कोरोनाच्या लसी परदेशी पाठवण्याच्या मुद्द्यावर चूप का आहेत?, त्यांनी या मुद्द्यावर नागरिकांच्या बाजूने केंद्र सरकार विरोधात बोलायला हवे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना जाब विचारावा, नाशिकच्या तरुणांना लस कधी मिळेल हा प्रश्न त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना विचारावा. लसीसारख्या जीवनावश्यक बाबीच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांसारख्या वजनदार नेत्यांनी चूप बसू नये, असे आवाहनही यावेळी आपच्या वतीने करण्यात आले आहे.
परदेशात केली जात असलेली लसींची निर्यात थांबवावी -
आपच्या वतीने जवळपास एक हजार पोस्टर्स संपूर्ण नाशिक शहरात लावण्यात येणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. हिंमत असेल तर आम्हाला अटक करून दाखवावी, असा इशारा देखील यावेळी या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. लसीकरणावरून आता तरुणवर्गात संतापाची लाट उसळली असून आता तरी केंद्र सरकारने देशातील नागरिकांना प्राधान्य देऊन परदेशात केली जात असलेली लसींची निर्यात थांबवावी, अशी मागणी आपने आहे.
हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून घेतला तौक्ते वादळाचा आढावा