नाशिक - मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे. कोल्हापूरमधून सुरू झालेले मूक आंदोलनाचा एक टप्पा नाशिकमध्येही होत आहे. 21 जूनला नाशिकमध्ये होणाऱ्या मूक आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत हे मूक आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मराठा कार्यकर्ते काळे कपडे परिधान करून सरकारचा निषेध नोंदवणार आहेत.
लोकप्रतिनिधी आरक्षणाविषयी काय भूमिका स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष-
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकमधील सर्व लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदारांना आमंत्रित देखील करण्यात आले असल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा राज्य समन्वयकांकडून सांगण्यात आले आहे. 'आम्ही बोललो, समाज बोलला, आता लोकप्रतिनिधींना तुम्ही बोला' या घोषवाक्य खाली हे आंदोलन पार पडणार असून यासाठी संपूर्ण राज्यभरातून मराठा समाज बांधव नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नाशिकमधील लोकप्रतिनिधी आरक्षणाविषयी काय भूमिका स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.