मनमाड (नाशिक) : मागील अनेक दिवसांपासून कोरोनाने थैमान घातल्यानंतर मनमाडकरांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरात आज (गुरुवार) एकाच कुटुंबातील १३ जण तसेच अन्य १, असे एकुण १४ जण कोरणामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे यात ४ वर्षाच्या बालकासह अन्य तीन लहान मुलाचांही समावेश आहे. मनमाड पालिका प्रशासनाने आणि कोविड-१९ च्या टीमने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि फुलांचा वर्षाव करुन अभिंनदन केले. सेंट झेवीयर्स हायस्कूलमधील कोविड सेंटरमधून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मनमाड शहरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या ३८ होती. त्यापैकी २४ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. उरलेल्या १४ जणांवर उपचार सुरू असुन त्यापैकी ८ जण मनमाड येथील सेंट झेवीयर्स हायस्कूलमधील कोविड सेंटरमध्ये तर उर्वरित ६ जण नाशिक येथे उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे यांनी सांगितले.
हेही वाचा.... कोरोनाने लोक मरतायेत.. आधी उपचार सुरू करा, नंतर रुग्णालयाचे उद्घाटन! भाजप आमदारांनी काढली लाज
गुरुवारी रुग्णालयातुन १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यात ४ लहान मुले, ६ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. यावेळी मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कोविड सेंटरमधील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी या रुग्णांवर सर्वांनी फुलांची उधळण केली आणि टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
४ वर्षीय मुलाचा उत्साह पाहून सर्वजण हर्षोल्हासित...
मनमाड शहरातील एकाच घरातील जवळपास १६ जण कोरोनाबाधित झाले होते. यात ४ लहान मुलांचा समावेश होता. मात्र, या चारही मुलांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. गुरुवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचा उत्साह पाहून इतरही लोक आनंदीत झाले आणि त्यांचे कौतुक केले.
शहर लवकरच कोरोनामुक्त...?
मनमाड शहरात आजवर ३८ कोरोनाबधित रुग्ण आढळले. यापैकी २८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. आता उरलेल्या १४ जणांवर देखील चांगले उपचार सुरू असुन लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल.
यानंतर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यानंतर मनमाड शहर हे कोरोनामुक्त होईल.