नाशिक - कोरानाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे भयभीत झालेल्या नाशिक शहरातील व्यापाऱ्यांनी पुढील आठ दिवस मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक मेनरोड, शिवाजी रोड या भागात दीड ते दोन हजार दुकाने असून ही सर्व दुकाने या निर्णयामुळे बंद असणार आहेत.
नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शहरातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने हजारी पार केल्याने नाशिककर चांगलेच भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे नाशिक शहरातील भद्रकाली, जुने नाशिक, मेन रोड, पंचवटी या मुख्य परिसरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच वाढत्या संख्येमुळे भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी नाशिक शहरातील शिवाजी रोड, मेन रोड ही मुख्य बाजारपेठ पुढील आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा... लॉकडाऊनचा फायदा घेत 'त्याने' कमाविले 49 लाख, आरोपी अटकेत
नाशिक शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या या निर्णयामुळे रविवार ते रविवार, अशी आठ दिवस मुख्य बाजारपेठ बंद असणार आहे. आज (शनिवार) सकाळी नाशिकच्या मेन रोड परिसरामध्ये झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून मेनरोड परिसराची ओळख आहे. रविवारपासून सुरू करण्यात येणाऱ्या या बंदमुळे या परिसरातील तब्बल दोन हजारहून अधिक दुकाने पुढील आठ दिवस बंद राहणार आहे. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या या निर्णयामुळे नाशिक शहरातील नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.