नाशिक - राज्य सरकारने मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली नाही तर, पाच नोव्हेंबरला सर्व नियम मोडून मंदिरे सुरू करू असा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी नाशिक शहरातील श्री कपालेश्वर मंदिराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना शासनाने जिम, मद्य विक्री, वाचनालय, सार्वजनिक वाहतूक यासह अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. मात्र राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करावीत अशी मागणी भाजपने केली आहे. धार्मिक स्थळे खुली करा, अन्यथा 5 नोव्हेंबरला सर्व नियम तोडून मंदिरे खुली करण्यात येतील असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मंदिरांच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्री कपालेश्वर मंदिरांसह सर्व प्रमुख मंदिरे बॅरिकेट्स लावून चारही बाजूने पॅक करण्यात आली आहेत.
हेही वाचा कांद्याच्या भावात मोठी घसरण; ऐन सणासुदीला शेतकऱ्यांवर मोठे संकट