नाशिक - नाशिकच्या वोक्हार्ट रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचारासाठी घेतले डिपॉझिटचे पैसे परत देण्यासाठी रुग्णालय प्रशासन टाळाटाळ करत होते. प्रशासनासमोर आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे आणि नातेवाईक अमोल जाधव यांनी अंगावरील कपडे काढून आंदोलन करताच रुग्णालय प्रशासनाने दीड लाख रुपये परत केले. मात्र, या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा - नाशिकच्या रतन लथ यांची राज्यपालांविरोधात जनहित याचिका
नाशिकच्या सिन्नर येथील रहिवासी अमोल जाधव यांनी आपल्या आई, वडिलांना कोरोना उपचारासाठी नाशिकच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. चौदा दिवसांच्या उपचारापोटी त्यांनी मेडिक्लेमच्या माध्यमातून सुमारे दहा लाख रुपयांचे बिल अदा केले. रुग्णांना दाखल करताना त्यांनी दिड लाख रुपये डिपॉझिटही भरले. रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर जाधव यांनी आपली डिपॉझिटची रक्कम परत मिळवण्यासाठी रुग्णालयाकडे पाठपुरावा सुरू केला. जाधव हे एका कंपनीत सात हजार रुपये पगारावर काम करतात. डिपॉझिट भरण्यासाठी व्याजाने पैसे आणल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, वारंवार रुग्णालयाचे हेलपाटे मारूनही रुग्णालयाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.
अखेर अमोल जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि आम आदमी पार्टीचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्याकडे तक्रार करत मदत मागितली. भावे यांनी ऑपरेशन हॉस्पिटल मोहिमेंतर्गत रुग्णालयात आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी अंगावरचे कपडे काढत जोपर्यंत डिपॉझिटची रक्कम परत दिली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला. अखेर अर्ध्या तासानंतर रुग्णालय प्रशासनाने डिपॉझिटची रक्कम परत करण्याची तयारी दर्शवल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर भावे यांना मुंबईनाका पोलिसांनी ताब्यात घेतले.
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
हे आंदोलन फेसबुकव्दारे लाईव्ह करत रुग्णालयाची पोलखोल करण्यात आली. रुग्णालयाच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्ते जितेंद्र भावे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले असता भावेंच्या समर्थनार्थ मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. भावे यांना तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते. सात तासानंतर त्यांची पोलीस ठाण्यातून सुटका झाली.
हेही वाचा - नाशिक: पाॅझिटिव्ह रुग्ण दर १०.४४ टक्क्यांनी खाली घसरला