नाशिक - द्राक्षाचे उत्पादनासाठी नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. लाखो टन द्राक्ष दरवर्षी इतर देशात नाशिकमधून निर्यात केले जातात. मात्र यावर्षी एक्सपोर्ट करणारा द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये थकवले आहेत. हे पैसे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लवकर द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना आणि कृषी विभागाला निवेदन दिले आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पिंपळगाव, निफाड, सिन्नर आदी भागात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र यंदा कोरोना संकटामुळे अनेक शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात कवडीमोल भावात द्राक्ष विकावे लागले. यात अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. तर दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून एक्सपोर्टची द्राक्ष तयार करून सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. मागील तीन ते चार महिन्यापूर्वी निर्यात केलेल्या द्राक्षाचे पैसे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले नाहीत. मोजक्या काही व्यापाऱ्यांनी 30 ते 40 टक्के पैसे दिले असून अनेक व्यापाऱ्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचे कारण पुढे करुन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.
याबाबत अनेकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रार केली. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकऱ्यांचे पैसे लवकर मिळावे, अशी मागणी केली आहे.