नाशिक - जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाबधितांचा आकडा मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोना संशयित 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. रुग्णालयाने या महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी चक्क नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाइकांनी देखील तब्बल 7 तास या महिलेचा मृतदेह फुलेनगर येथे घरात ठेवला. याच दरम्यान, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
मृत महिलेच्या नातेवाइकांनी जिल्हा शासकीय रुग्णलयाला या घटनेचा जाब विचारल्यानंतर डॉक्टरांनी मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणून द्या, असे सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे मृत महिलेचे नातेवाईक संतप्त झाले आणि मृतदेह नेऊन न देण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. शेवटी जिल्हा रुग्णालयाने मध्यरात्री 1 च्या सुमारास शासकीय पथक पाठवून या कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कार केले.
पण याआधी कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह घरी दिल्याने नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला असून याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
पंचवटी परिसरातील फुलेनगर, पेठ रोड, राम नगर हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून समोर आला आहे. असे असताना दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या चुकीच्या कारभारामुळे या भागात आणखी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.