नाशिक - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यासह महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस बलात्काऱ्यांना वाचवत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. राज्यात शिवशाही नसून मोगलाई असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात सरकार मंत्री संजय राठोड यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात संजय राठोड नक्की कोण? हे पोलीस सांगत नाही. पूजा चव्हाणच्या मोबाईलवर ४५ मिस कॉल आहेत. तो फोन पुणे पोलिसांकडे आहे. ते मिस कॉल संजय राठोड यांचे आहेत. मग हा संजय राठोड नेमका कोण हे पोलीस जनतेपुढे का आणत नाहीत? असा सवाल वाघ यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.
नावाला शिवशाही उरलीय-
ज्या दिवशी आत्महत्येची घटना घडली, त्यावेळी कंट्रोल रूमला फोन गेला होता. याबाबत अरूण राठोडने सर्व प्रकार सांगितला आहे. ९१४६८७०१०० या नंबरवर कॉल करायला कंट्रोलमधून सांगण्यात आले होते. त्यावेळी कॉन्फरन्स कॉल केला गेला आणि पुन्हा माहिती सांगण्यास सांगितली होता. मग कॉन्फरन्स कॉलवर इतर दोन व्यक्ती कोण आहेत. याची माहिती का दिली जात नाही. तो तिसरा व्यक्ती कोण होता याची माहिती का दिली नाही, असा सवाल वाघ यांनी केला. तसेच पुणे कंट्रोलने हा मोबाईल नंबर कसा काय दिला. हा नंबर नक्की कोणाचा? सरकार नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? या आत्महत्या प्रकरणी साधा एफआयआर ही दाखल झाला नाही, त्यामुळे राज्यात शिवशाही नाही, तर मोगलाई असून शिवशाही केवळ नावाला उरल्याची टीकाही चित्रा वाघ यांनी केली.
पूजा चव्हाण प्रकरणात ज्या १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, त्याबद्दल अजून स्पष्टता झाली नाही, ही पोलिसांची मुजोरी आहे. जर अरूण राठोडच्या मोबाईल मधून ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या तर त्याच्याकडे आणखी माहिती उपलब्ध असू शकते, मग पोलिसांनी कारवाई न करता त्याला कशासाठी सोडलं? तुम्ही कोणाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहात? सरकार बलात्काऱ्याला आणि हत्या करणाऱ्यांना वाचवण्यासाठी धडपडत असल्याचा आरोप वाघ यांनी केला.
मोबाईलमधील आवाज हा संजय राठोड यांचाच -
पूजा चव्हाण प्रकरणात तपास यंत्रणेवर दबाब आहेच शिवाय पोलीस यंत्रणा निर्ढावलेली असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. त्या ऑडिओ क्लिपपमधील आवाज संजय राठोड यांचा असल्याचं महाराष्ट्रातील लहान पोरगं देखील सांगू शकेल. मात्र, या प्रकरणात उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचंही वाघ म्हणाल्या.
हे षंढ, नामर्द सरकार-
तीन पक्षांचं सरकार संजय राठोड यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची युती बलात्काऱ्यांना वाचविण्यासाठीच झाली आहे. एका मंत्र्याने खुर्ची वाचवली तर दुसऱ्याची खुर्ची वाचवण्यासाठी धडपड सुरू असल्याचा आरोप करत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. हे सरकार षंढाचे आणि नामर्द सरकार असल्याची घणाघाती टीकाही वाघ यांनी यावेळी केली.
या बलात्काऱ्याला मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सांगताना चित्रा वाघ म्हणाल्या की, बाळासाहेब असते तर संजय राठोडसारख्यांना फाडून खाल्लं असतं. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर पोरींचा छळ करणार का? तसंच शक्ती प्रदर्शन केल्यावर कोणी निर्दोष होतं का? असा सवालही त्यांनी संजय राठोड प्रकरणावरून सरकारला विचारला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी अरूण राठोड आणि विलास हे पोलिसांच्या ताब्यात होते. मग त्यांना का सोडलं? सरकार पूजा चव्हाण प्रकरणावर बोलायला तयार नाही. तसेच या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आहे का? आणि असेल तर तो सहन न करता वेगळेपण दाखवून द्या. तसंच संजय राठोड यांच्यावर बलात्काराचा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.