नाशिक - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आरोग्य यंत्रणेपुढे नवे संकट उभे राहिले आहे. शहराच्या सातपूर भागात चिकनगुनिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या चिकनगुनियाचे 31, तर डेंग्यूचे 65 रुग्ण आढळून आले आहेत. सातपूर भागात याचा मोठ्याप्रमाणात फैलाव होत असल्याने प्रशासन उपाययोजना करण्यासाठी सतर्क झाले आहे.
पावसाळा सुरू होताच नाशिक शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र दुसरीकडे चिकणगुनिया आणि डेंग्यू आजाराने शहरात डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य विभागापुढे पुन्हा या आजारांना रोखण्याचे आव्हान समोर उभे राहिले आहे. शहरात चिकनगुनियाचे 31 तर डेंग्यूचे 65 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात चिकनगुनियाचा अधिक प्रसार हा सातपूर भागात झाला आहे. त्यामुळे तिथे आरोग्य विभागाकडून फवारणी तसेच तपासणीचे काम सुरू आहे. आरोग्य विभाग आपले काम करत असला तरी नागरिकांनी ही या आजाराबाबत तितक्याच गांभीर्याने काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या घरात पाणी जास्त वेळ साचून न ठेवणे, घरात स्वच्छता ठेवणे, डास होणार नाहीत याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. तेव्हाच या आजारांना आपण दूर ठेऊ शकतो. अन्यथा पावसाळ्यात हे आजार अधिक वाढू शकतात, असे आवाहन आरोग्य विभागाकडून कऱरण्यात आले आहे.
सातपूर भागातील 107 रक्ताच्या नमुन्यात 31 रुग्णांना चिकनगुनिया; 5 जणांना डेग्यू
शहरातील शहरात तापाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागातील रहिवाशांच्या रक्ताचे नमुने घेतले. सर्वांत जास्त रुग्णसंख्या असलेल्या सातपुर भागातून 107 नमुने घेण्यात आले आहेत. या नमुन्यांपैकी 31 रुग्ण चिकनगुनियाचे तर 5 रुग्ण डेग्युने बाधित आढळून आले आहेत. गेल्या वर्षी शहरात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नव्हता, मात्र या वर्षी पावसाळा सुरू होताच रूग्णांनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
डेंग्यू आजाराची लक्षणं...
डेंग्यू हा आजार एडीस डास चावल्याने होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला कमी जास्त ताप येणे, अंग दुखणे, डोके दुखणे इत्यादी लक्षणं जाणवतात. त्याचबरोबर ताप कमी झाल्यानंतर लालसरपुरळ येते, शरीराच्या सर्वत्र खाज सुटणे, इत्यादी त्रास जाणवू लागतात. तसेच, यामुळे रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी ही कमी होतात. त्यामुळे डेंग्यूची लक्षणं दिसताच तात्काळ वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.