नाशिक - जुने नाशिक भागातील दोन चिकन व्यावसायिकांमध्ये व्यावसायिक कारणावरून वाद होत हाणामारी झाली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
नाशिकच्या जुने नाशिक भागातील दुकानामध्ये ग्राहक इकडे तिकडे गेल्याने दोन दुकानदारांमध्ये वाद होत कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (२६ जुलै) दुपारच्या सुमारास रजा चिकन व गुडलक चिकन दुकानामधील ग्राहक इकडे तिकडे गेल्याने या दोन्ही व्यावसायिकांमध्ये वाद झाला. यात रजा चिकनचे समीर खान, मजहर खान यांच्यावर गुडलक चिकन दुकानाचे मालक इम्रान खान इतर सशयितांनी वार केले. यात इम्रान खानही जखमी झाले आहेत. या घटनेत समीर खान यांच्या छातीवर गंभीर जखमा झाल्या असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. तसेच बाजूला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात हा सर्व प्रकार कैद झाला असून, पोलीस या व्हिडिओच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेत आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सोमवारी देखील झाला होता वाद -
सोमवारी देखील या दोन दुकानदारांमध्ये शाब्दिक वाद झाले होते. तसेच याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार देखील देण्यात आली होती. पोलिसांनी वेळीच या दोघांना समज दिली असती तर आजची घटना घडली नसते असे नागरिकांचे म्हणणे आहे.