नाशिक - पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याच्या कारणावरून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजलक्ष्मी पिल्ले या महिलाविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.ही महिला आत्मदहन करणार असल्याची पूर्वकल्पना नाशिक पोलिसांना दिल्याने त्यांनी बंदोबस्त लावून तिला ताब्यात घेतल्याचं सरकार वाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितलं आहे. मात्र, या महिलेने हे पाऊल का उचलले या बद्दल मात्र बोलण्यास नकार दिला आहे.
पोलिसांकडून दखल न घेतल्याचा आरोप
एकीकडे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी नाशिक दौऱ्यावर असतांनाच दुसरीकडे युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी दुपारी त्यांच्या पतीसमवेत नाशिक पोलीस आयुक्तालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. श्रमिक सेनेचे पदाधिकारी अजय बागुल यांच्या कडून झालेल्या मारहाणीबाबत इंदिरानगर पोलिसांकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांच्याकडून केला होता. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी पिल्ले दाम्पत्याने हे कृत्य केले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सरकारवाड़ा पोलिस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये घडला गंभीर प्रकार
कारमध्ये जाणाऱ्या महिलेसह तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांना पोलिस पाठिशी घालत असल्याचा आरोप करुन एका महिलने पतीसह पाेलिस आयुक्त कार्यालयाबाहेर पेट्राेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, गृहमंत्री हे नाशिकमध्ये असताना हा गंभीर प्रकार घडला. पाेलिसांनी दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात शिवसेना नेते सुनिल बागुल यांचा पुतण्या अजय बागुल हा मुख्य संशयित असून पाेलिस आयुक्तांनी नुकतेच त्याला माेक्का कारवाईतून वगळले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातून चौकशी करण्याच्या सूचना
राजलक्ष्मी मधुसुदन पिल्ले रा. मुरलीधरनगर, पाथर्डीफाटा असे महिलेचे नाव आहे. त्या युवा स्वाभिमानी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष असून पिल्ले आणि त्यांचे कुटुंब ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सांयकाळच्या सुमारास सिडकाेतील त्रिमूर्ती चौक परिसरातून जीत होते. संशयित अजय बागुल, अंकुश वऱ्हाडे आणि प्रदीप चव्हाण या तिघांनी पिल्ले यांची कार अडवून त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी पिल्ले यांना रामवाडी भागात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिल्ले यांनी सुटका करून घेत अंबड पोलिस ठाणे गाठले. पिल्ले यांनी तक्रार नोंदवण्यासाठी अर्जही दिला. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. पिल्ले यांच्या पाठपुराव्यानंतर अंबड पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र, त्यातून अजय बागूलचे नाव वगळण्यात आले. यानंतर पिल्ले यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे माहिती दिली.
दोघांना घेतले ताब्यात
अखेर पोलिस महासंचालक आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिले. तेथूनही चौकशी करण्याच्या सूचना आल्या, पण बागूलविरोधात कारवाई झालीच नाही, असा आराेप पिल्ले यांनी केला आहे. या संशयितांवर कठाेर कारवाई हाेत नाही, म्हणूण पिल्ले यांनी साेमवारी क्रांतीदिनी पाेलिस आयुक्त कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला हाेता. त्यानुसार कारवाईच हाेत नसल्याचे कळताच पिल्ले या दि.९ राेजी पतीसह दुचाकी वर बसून आल्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हातातील पेट्राेल कॅन अंगावर ओतून घेतले. पाेलिस आयुक्तालयाच्या गेटवरील सुरक्षारक्षकांनी दाम्पत्याकडील पेट्राेलची कॅन हिसकावून दाेघांना घेत ताब्यात घेतले.
माेक्काच्या गुन्हेगारांची दहशत सुरुच
पाेलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हेगार सुधार याेजनेअंतर्गत माेक्का गुन्ह्यातील अजय बागुलसह इतर सराईतांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र लिहून घेतले आहे. असे असतानाही बागुलसह अन्य सराईत गुन्हेगारीचाच मार्ग अवलंबून पाेलिसांनाच थेट आव्हान देत आहेत, हे या घटनेवरुन दिसून आले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे हे नाशिक शहरात असताना ही गंभीर घटना घडल्याने पाेलिस आयुक्त रडारवर येण्याची दाट शक्यता आहे.