नाशिक - शहरातील लेखा नगर परिसत मद्यधुंद अवस्थेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कारने दुसऱ्या एका कारला धकड दिली होती. यानंतर जाब विचारणाऱ्या समोरील गाडीतील व्यक्तींना शिवीगाळ करत मारहाण देखील केली होती. या प्रकरणाची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेत, त्या दोन्ही पोलीस बंधूंचे निलंबन केले आहे. या कारवाईमुळे नाशिक पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... गृहमंत्र्यांची गडचिंचले तिहेरी हत्याकांड घटनास्थळी भेट; पोलीस अधीक्षक सिंग यांना सक्तीच्या रजेचा आदेश
नाशिकच्या सिडको येथील लेखा नगर परिसरात 5 मे रोजी पोलीस शिपाई सागर हजारे आणि मयूर हजारे हे दोघे मद्यधुंद अवस्थेत कारने जात होते. यावेळी त्यांच्या कारने (कार क्रमांक एम. एच. 18 डब्ल्यू 3756) दुसऱ्या एका कारला जोराची धडक दिली. यानंतर समोरच्या कारमधील चालकाने याबाबत दोन्ही पोलीस बंधूंना जाब विचारला असता, त्यांना शिवीगाळ करत मारहाण देखील केली होती. या प्रकरणी संबंधीत कार चालक सागर जाधवे दोघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि या दोन्ही पोलीस बंधूंना निलंबित केले आहे.
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस आहेत. तर दुसरीकडे सामाजिक भान हरवलेले असे काही पोलीस कर्मचारी खाकीची प्रतिमा मलीन करत आहेत. याबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.