नाशिक - नांदगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी खोटी तक्रार देऊन पाेलिसांंची दिशाभूल केली आहे. तसेच, माझ्या बदनामीसाठी पालकमंत्री भुजबळ यांच्याशी माझे कनेक्शन जोडून मी आमदार कांदे यांना धमकी दिल्याची तक्रार दिली. हे साफ खाेटे असून, कांदेंवर मी ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे. तसेच, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना सर्व प्रकरणाची सत्यता तपासून आमदार कांदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे मुंबई प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
याचीका मागे घेण्यासाठी धमकीचा फोन
समन्स बजावल्यावर निकाळजे यांनी शनिवारी (दि. २) गंगापूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. तीन तास चाललेल्या जबाबानंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा नियोजन निधीच्या निधी ताब्यात घेऊन भुजबळ यांनी नांदगावला कमी निधी दिल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला होता. त्याबाबत उच्च न्यायालयात याचीकाही दाखल केली. दोघांच्या या वादामध्ये कुख्यात गुंड छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याच्याकडून ती याचिका मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याची तक्रार कांदे यांनी शहर पाेलिसांकडे केली होती. मात्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे मुंबई प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी पत्रकार परिषद घेत या विषयी स्पष्टीकरण दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही समन्स बजावले होते. मी गेले चार- पाच वर्षे रिपब्लिकन पक्षाचे काम करतो. राज्यात पक्षाचा विस्तार झाला आहे. युवकांमध्ये माझे चांगले स्थान आहे. आजवर माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. उलट आमदार कांदे यांच्यावर खंडणी, फसवणूक असे अनेक गुन्हे दाखल आहे, असे निकाळजे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - भुजबळांविरोधातील तक्रार मागे घे; आमदार सुहास कांदेंना छोटा राजन टोळीचा फोन?