नाशिक - गेल्या 15 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आज बँकेच्या विभागीय कार्यालयाबाहेर कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन केले आहे.
हेही वाचा - भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ; 'आयएनएस कवरत्ती' घेणार शत्रूचा अचूक ठाव
नाशिकच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय कार्यालयात जवळपास 30 सफाई कर्मचारी हंगामी तसेच अर्धवेळ काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी तुटपुंज्या म्हणजेच 9 हजार रुपये इतक्या मानधनावर काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी या सर्वच कर्मचाऱ्यांनी आपल्याला वेतनवाढ मिळायला हवी, अशी मागणी बँक व्यवस्थापनाकडे केली होती. कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि व्यथांचा विचार करून बँक व्यवस्थापनाने या कामगारांना पदोन्नती व वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही दिवसांनंतर व्यवस्थापनाने अचानकपणे निर्णय मागे घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या गडकरी चौक येथील विभागीय कार्यालयाबाहेर कुटुंबीयांसोबत हातात फलक घेऊन निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, बँक व्यवस्थापनाने आधी घेतलेला निर्णय तत्काळ नियमित करावा, अन्यथा येत्या काळात कुटुंबीयांसह बँकेच्या आवारात आमरण उपोषण करू, असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बँकेत काम करणाऱ्या या सफाई कामगारांना न्याय मिळणार की यांचा संघर्ष असाच सुरू राहणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.