नाशिक - वाढत्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वाढून पर्यावरणास धोका पोहोचत आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या मानांकनापेक्षा जास्त प्रदूषण करणाऱ्या आणि धूर ओकणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन विभाग तसेच नाशिक प्रदूषण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज वाहनांचे प्रदूषण तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ऑनलाईन वाहनांची तपासणी करून २०० उत्तीर्ण वाहनांना ऑनलाईन पीयूसी प्रदान करण्यात आली. तसेच मानांकनापेक्षा जास्त प्रदूषण करणाऱ्या २ वाहनचालकांना समज देण्यात आला. यावेळी आपल्या वाहनांसाठी आरटीओतर्फे प्राधिकारपत्र प्राप्त पीयूसी सेंटरकडूनच ऑनलाईन पद्धतीनेच प्राप्त करावे आणि वायू प्रदूषण कमी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले.
मानांकनापेक्षा जास्त धूर ओकणाऱ्या वाहनांवर तसेच चुकीची नंबर प्लेट वापरून पीयूसी काढणाऱ्यांना आळा घालण्यासाठी आता ऑनलाईन पीयूसी सिस्टीम चालू झाली आहे. या सिस्टीममध्ये गाडीचा फोटो आणि पूर्ण डाटा फीड होऊन कायमस्वरूपी जतन केली जात असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी दिली. या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन कार्यालय मोटर वाहन निरीक्षक सचिन बोधले तसेच प्रदूषण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत जोशी यांनी ऑनलाईन वाहनाची तपासणी करून या उपक्रमाला सुरूवात केली.